गोपीनाथ पांडुरंग मुंडे

भगवानगड

     श्रीक्षेत्र "भगवानगड" हे महाराष्ट्र राज्यातील बीड-अहमदनगर जिल्ह्यांतील सीमेवर असलेल्या, खरवंडी गावाच्या बाजूला डोंगरावर वसलेले निसर्गरम्य देवस्थान आहे. या निसर्गरम्य देवस्थानलगतच राष्ट्रीय महामार्ग कल्याण ते विशाखापटणम हा जातो. महाराष्ट्र राज्यातील एक प्रमुख आणि जागृत तीर्थक्षेत्र म्हणून श्रीक्षेत्र भगवानगड हे ओळखले जाते. या ठिकाणी विठ्ठल आणि पांडवांचे पुरोहित असलेल्याधौम्य ऋषींचे मंदिर आहे. तसेच जनार्दनस्वामी, भगवानबाबा व भीमसिंह महाराज यांच्या समाध्या येथे आहेत. सर्व जातिधर्मातील लोकांमध्ये एकोपा राहावा म्हणून भक्तीचा गड श्रीक्षेत्र भगवानगड याची उभारणी झालेली आहे. महाराष्ट्र राज्यातील ऊसतोडणी मजुरांचे श्रद्धास्थान म्हणूनही भगवानगडाकडे पाहिले जाते. मराठवाड्यासह महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान आणि सर्वधर्म समभावाचे प्रतीक म्हणून श्री क्षेत्र भगवानगडाकडे बघितले जाते..

इतिहास

     या ठिकाणाच्या प्राचीन इतिहासाविषयी अशी आख्यायिका सांगितली जाते की येथे सप्तर्षींनी तपश्चर्या केली होती. पांडवांचे पुरोहित असलेल्या धौम्य ऋषींचे या भागात वास्तव्य असल्याचा उल्लेखही काही पुराणांमध्ये आहे. धौम्य ऋषींच्या पादुका असलेले हे ठिकाण 'धौम्यगड' किंवा 'धुम्यागड' म्हणून ओळखले जात होते. येथील धौम्य ऋषीच्या मंदिराचे अस्तित्व काही हजार वर्षांपूर्वीपासून असल्याची नोंद आहे. या प्राचीन मंदिराविषयी अनेक दंतकथा सांगितल्या जातात. याचबरोबर रंग ऋषी, भारद्वाज ऋषी, शृंगीऋषी, पराशर ऋषीचे यांचे वास्तव्य लाभलेले हे ठिकाण. हे ठिकाण सदगुरू जनार्दनस्वामी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले आहे. यानंतर दुर्दैवाने अनेक वर्षे धौम्यगड दुर्लक्षित असल्याने जुने अवशेष तसे फार कमी आहेत. या जवळच काशी केदारेश्वराचे मंदिर, हरिहरेश्वराचे भव्य मंदिरे आहे. काशी केदारेश्वराचे मंदिर नागलवाडी परिसरात आहे. हे ठिकाण राम लक्ष्मण आणि सीता यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले आहे. येथे सीतेचा संसार असल्याचे सांगितले जाते. येथे अनेक मोठे जाते, रांजण आहे. सीतेला तहान लागली म्हणून रामाने येथे रामबाण चालवले असल्याचा उल्लेखही काही पुराणांमध्ये आहे. येथे मुख्य उत्सव श्रावण सोमवारला सुरु होतो.

धौम्यगडाचा जीर्णोद्धार

     यानंतर ह्या धौम्यगडाचे ऐतिहासिक महत्त्व जाणून श्री संत शिरोमणी ह.भ.प. भगवानबाबा येथे वास्तव्यास आले आणि भक्तांच्या प्रेमाग्रहाखातर तेथेच विसावले. येथे भगवानबाबांनी धौम्य ऋषीच्या पादुकांचे दर्शन घेतले. त्यांच्या अथक धाडसीवृत्ती आणि लोकसहभाग यातून भक्तीचा गड उभारणीचे काम सुरू झाले आणि गडाचे भाग्य उजळले. भागवत धर्मच्या भगवा फडकला. बाबा स्वत: वास्तुशास्त्रात निपुण होते. विशेष म्हणजे गडाचे संपूर्ण बांधणी पाषाणात असून लाकडाचा वापर न करता केलेले आहे. ओवऱ्यासाठी नवगण राजुरी येथील राजूबाईच्या डोंगरावर हजारो वर्षापासून पडलेल्या पाषाणखांडे आणले होते. सर्व पाषाणखांडे बैलगाडीने आणले गेले आणि त्यांनी चौकोनी चीर्यांचे रूप दिले गेले. त्यामुळे बांधकाम भक्कम झालेले आहे. स्वतः भगवानबाबा आजूबाजूच्या परिसरात फिरून गडाच्या बांधकामासाठी आवाहन करत होते. भगवानबाबाला तन-मन-धनाने काम करणारे भक्तगण भेटले. त्यांना तसा प्रतिसादही मिळत होता. गड उभारणीच्या कामाला आजूबाजूच्या परिसरातील भक्तगणांनी भरभरून मदत केली. स्त्रियांनी स्वत:चे दागदागिने, अलंकार, आभूषणे दिली आणि बांधकामासाठी निधी उपलब्ध झाला. प्रत्येक भक्तगण या कार्याला हातभार लावत होते. भक्तगणांनी घरून स्वत:च्या भाकरी-भाजी आणून, रात्रंदिवस गडाचे बांधकाम पार पाडले. पाहता पाहता भक्तीचा गड श्रीक्षेत्र भगवानगड ही अत्यंत विस्तीर्ण प्रचंड भव्य वास्तू नावारूपास आली. उत्कृष्ट वास्तुशिल्पकलेचा हा एक अलौकिक आविष्कार आहे. त्यांच्या संकल्पनेतूनच धौम्यगडाचा जीर्णोद्धाराची खर्‍या अर्थाने मुहूर्तमेढ ही रोवली गेली व भक्तीचा गडाची स्थापना झाली. त्यानंतर खर्‍या अर्थाने धौम्यगडाचा कायापालट झाल्याचे पहावयास मिळाले. त्यांनी रस्त्यांच्या दुर्दशेवर प्रकाश टाकत रस्ता विकास करण्यावर भर दिला. भक्तांना एकत्र करून श्रमदानाने भगवानगड ते पायथ्याच्या खरवंडी गाव रस्ता करण्याचे काम पूर्ण झाले. पुढे इ.स. १९५८ मध्ये स्वामी सहजानंद सरस्वती, ह.भ.प. मामासाहेब दांडेकर आणि बाळासाहेब भारदे यांच्या हस्ते विठ्ठलाच्या मूर्तीची देवळात प्रतिष्ठापना केली. गडाचे उद्‌घाटन मुंबई प्रांताचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते १ मे १९५८ रोजी झाले. यावेळी मुख्यमंत्रीयशवंतराव चव्हाण बोलताना म्हणाले की, ‘‘धर्मरक्षणासाठी भगवानबाबांनी भक्तांना एकत्र करून शास्त्राच्या आधाराने भक्तीचा गड उभारण्याचे काम केले आहे. आजपासून धौम्यगड हा भगवानगड म्हणून ओळखला जावा.’’ तेव्हापासून धौम्यगडाचे नाव भगवानगड असे पडले. याचवेळेस बाबांच्या संकल्पनेतून भगवान विद्यालयाने आकार घेतला. शालेय शिक्षणाची सोय व्हावी म्हणून गडावर भगवान विद्यालयाची कोनशिला बसविली आहे. वाड्या, पाड्या, तांड्यांवरील मुले या ठिकाणी शिक्षणासाठी आहेत.

उत्सव

     सर्व जातिधर्मातील लोकांमध्ये एकोपा राहावा म्हणून भक्तीचा गड श्रीक्षेत्र भगवानगड याची उभारणी झालेली आहे. भगवानगडावर उत्सव विजयादशमीला, पौष वि प्रतिपदाला, प्रत्येक शुद्ध एकादशी याशिवाय कार्तिक पौर्णिमाला सुरु होतो.

विजयादशमी सीमोल्लंघन उत्सव

     भगवानगडावर मुख्य उत्सव विजयादशमीला सुरु होतो. भगवानबाबांनी विजयादशमी साजरी करण्यामागे खेडय़ापाडय़ातील भाविकांनी एकत्र येऊन एकमेकांच्या सुखदु:खाची विचारांची देवाणघेवाण करावी हा उद्देश होता. आजही मोठय़ा उत्साहात व एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने विजयादशमी उत्सव साजरा केला जातो. येथील विजयादशमीला वैभवशाली इतिहासाची ७५ वर्षांपेक्षा जास्त परंपरा लाभलेली आहे. गडावर विजयादशमीला गुरूपदेश घेण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून मोठय़ा प्रमाणात अनेक जाती-धर्माचे व पंथाचे भाविक येथे दर्शनाला येतात. येथे विजयादशमीला 'सीमोल्लंघन उत्सव' साठी भाविकांची रीघ लागते. या दिवशी दोन लाखावर भाविक सहभागी होतात. येथील वैशिष्ट्य म्हणजे येथे अनोळखी माणसे एकमेकांना विजयादशमीच्या शुभेच्छा देताना दिसतात. या भाविकांसाठी जेवणाची व्यवस्था केलेली असते. बाजरीच्या पिठापासून बनवलेली व चुलीच्या विस्तवावर भाजलेल्या भाकरी आणि शिजवलेल्या भरड्या डाळीच्या पीठ्ठले यांची चव वेगळीच असते. मठ, देवळे, आखाडे, धर्मशाळा, फड वगैरेंमधून अनेक भाविक व वारकऱ्यांची सोय होते. या भाविकांसाठी चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जातात.

भगवानबाबांची पुण्यतिथी

     श्रीक्षेत्र भगवानगड येथे भगवानबाबांची पुण्यतिथीनिमित्त पौष वि प्रतिपदाला हरिनाम सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन जानेवारीत करण्यात येते. यावेळी गडावर भगवानबाबांचा सप्ताह सुरु होतो व पुढे आठ दिवस चालतो. यावेळी भगवानबाबाच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी दोन-तीन लाखो भाविकांची गर्दी उसळते.

शुद्ध एकादशी उत्सव

     प्रत्येक शुद्ध एकादशी उत्सव गडावर साजरा होतो. या उत्सवात येथे नियमित पूजाअर्चा, महाअभिषेक प्रवचने, गायन, भजन, कीर्तन व भोजन असे कार्यक्रम होत असतात. गडावर ग्रंथपारायण, शैक्षणिक, वैद्यकीय मदत, भाविकांना भोजन व महाप्रसाद असे उपक्रम राबविले जातात. उत्सवाची सांगता काल्याकीर्तनाने होते. या दिवशी भगवानगडाच्या गादीवरील महंत कीर्तन करत नाहीत. या दिवशी एक लाखावर भाविक येतात. या सर्वासाठी चहा-फराळाची उत्तम सोय केलेली असते. गडावर १२ महिने २४ तास अन्नदानाचा कार्यक्रम सुरूच असतो. याशिवाय कार्तिक पौर्णिमाला गुरूपदेश घेण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून मोठय़ा प्रमाणात अनेक भाविक दर्शनाला येतात. या दिवशी दोन लाखावर भाविक सहभागी होतात. भगवानगडावर १८ एप्रिल ते २५ एप्रिल २००८ दरम्यान अमृत महोत्सवनिमित्ते राष्ट्रीय पातळीवरचा अखंड हरिनाम सप्ताह झाला. भगवानबाबांनीसुरू केलेल्या नारळी सप्ताहास २००८ या वर्षी ७५ वर्षे पूर्ण होत असल्यामुळे त्या दिवशी ७५ हजारांपेक्षा जास्त भक्त ज्ञानेश्वरी पारायणास बसले होते. सप्ताहादरम्यान ह. भ. प. रामराव महाराज ढोक यांचे रामायण, काकडा आरती, गाथाभजन, कीर्तन, प्रवचन, चक्री प्रवचन, भारूड, रात्रजागर आयोजित केला आहे. शेवटच्या पंगतीत भक्तांना पुरणपोळी व दूध दिले गेले.

पालखी

भगवानबाबा आपल्या कार्यातील बराच काळ त्यांनी संपूर्णपणे नारायणगडावर व भगवानगडावर व्यतीत केला असला तरीही कीर्तनकारणे भगवानबाबांची भ्रमंती पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातल्या खेड्यापाड्यांतून झालेली आहे. भगवानबाबांनी पंढरपूर, आळंदी, पैठणवारीच्या पालखीची प्रथा पाडली. भगवानबाबा आपल्या भाविक भक्तांसोबत दरवर्षी नित्यनेमाने आषाढीवारीच्या निमित्ताने पंढरपूर येथे जात असत. भगवानबाबांची पालखी महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी पालखी आहे. ही पालखी पंढरपूरला भगवानबाबांच्या पादुका घेऊन भारजवाडी, खरवंडी, करंजवण, पाटोदा, भूम, कुर्डूवाडी, परंडा मार्गे जाते. वाखरी येथे संत ज्ञानेश्वरांच्या पालखीला आडवी जाण्याचा मान या पालखीला आहे. भगवानबाबाभगवानगडावर असताना पालखीकरिता हत्ती, घोडे, अंबारीसह वगैरे सर्व लवाजमा असे. भगवानगडाची पालखी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पालखीसोबत मराठवाड्याचे असंख्य वारकरी वारीला निघतात. दरवर्षी वारकरी परंपरेनुसार नामस्मरण करत भगव्या पताका खांद्यावर घेऊन वारीमध्ये सहभागी होतात. संत श्री एकनाथ संस्थान पैठण येथे पालखी व नाथषष्ठी दिंडीचा मान भगवानगड पालखीला आहे. नाथषष्ठीनिमित्त ‘भानुदास एकनाथ’चा नामस्मरण करत भगव्या पताका घेऊन पालखी श्रीक्षेत्र पैठण येथे एकनाथ मंदिरात जातात. दक्षिण गंगा असलेल्या गोदावरी पात्रात पवित्र स्नान करून वारकरी संत श्री एकनाथ दर्शन घेतात. पालखीत एकनाथ वारीसाठी भाविकांचा ओघ सुरूच आहे. भगवानगडाची पालखीत दर्शनासाठी गर्दी करत व या निमित्ताने पालखी भाविक भक्तांनी फुलून जात आहे.

जाण्याचा मार्ग

  • •महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये खरवंडीहून दर तासाला खासगी वाहनांची सोय आहे. खरवंडीगावामध्ये राहण्याची व्यवस्थाही आहे.
    • श्रीक्षेत्र भगवानगड हे टेकडीच्या माथ्यावर असून पक्क्या रस्त्याने पायथ्याच्या खरवंडी गावापासून सुमारे ४-५ कि.मी. अंतरावर आहे.
    • भगवानगडाच्या सर्वात जवळचे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे बस स्थानक खरवंडी येथे आहे.
    • मुंबई-पुणे-अहमदनगरवरून पाथर्डीमार्गे भगवानगडावर पोहोचता येते. राष्ट्रीय महामार्ग कल्याण ते विशाखापटणमवर पाथर्डीपासून साधारणपणे ३० कि.मी. अंतरावर भगवानगड वसले आहे.
    • औरंगाबाद-पैठणवरून शेवगावमार्गे महाराष्ट्र राज्य महामार्ग क्र. १४८ वर पैठणपासून ७० कि.मी. अंतरावर भगवानगड आहे.
    • बीड-गेवराईवरून पाडळसिंगीमार्गे ७० कि.मी. अंतर पार करुन भगवानगडावर जाता येते.
    • भगवानगडाच्या सर्वात जवळचे रेल्वेस्थानक अहमदनगर येथे आणि विमानतळ औरंगाबाद येथे असून आंतरराष्ट्रीय विमानतळ पुणे येथे आहे.
    • भगवानगड हे राष्ट्रीय महामार्ग कल्याण ते विशाखापटणम आणि राज्य महामार्ग क्र. १४८ (अहमदनगर-अमरापूर-शेवगाव-पैठण) या महामार्गांनी महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेशमधील शहरांशी जोडले गेले आहे.
    • औरंगाबाद-पैठण मार्गे किंवा बीड-गेवराईवरून पाडळसिंगीमार्गे जाण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या व अनेक खासगी वाहतूक कंपन्यांच्या बसगाड्याही उपलब्ध आहेत. महाराष्ट्रातून येथे अनेक बस येतात. श्रीक्षेत्र भगवानगड येथे जाणा-या भाविकांसाठी शेवगाव, गेवराई, पैठण, पाथर्डी परिवहन महामंडळ बसस्थानकमधुन बसची ये-जा चालू असते.