गोपीनाथ पांडुरंग मुंडे

वैद्यनाथ कारखाना परिसरात "गोपीनाथगडा" चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपुजन

  • दि.१२ डिसेंबर २०१४ रोजी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीचे औचित्य साधून वैद्यनाथ कारखान्याच्या प्रांगणात गोपीनाथगडाची पायाभरणी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाली.न्यायाचार्य नामदेव शास्त्री, भैय्यू महाराज,पांडुरंग फुंडकर,राज्यमंत्री दिलीप कांबळे, महादेव जानकर, विनायक मेटे, यांच्यासह अनेक मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती.

लोकनेते गोपीनाथ मुंडेंच्या नावाने ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची स्थापना - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • गोपीनाथ मुंडे यांना सातत्याने असंघटीत असलेल्या ऊसतोड कामगारांच्या भविष्याची चिंता असायची. या असंघटीत कामगारांच्या हितासाठी संघर्ष करणाऱ्या गोपीनाथराव मुंडे यांच्या नावाने ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची स्थापना करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. विशेष म्हणजे गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण मंडळाचे मुख्यालय परळी वैजनाथ येथे राहणार असून, गोपीनाथरावांना अपेक्षित असलेला विकास या मंडळाच्या माध्यमातून केला जाईल असेही मुख्यमंत्री म्हणाले.

"गोपीनाथगड" हा मुंडे साहेबांच्या विचारांची संस्था असेल - ना.पंकजाताई मुंडे

  • मुंडे साहेबांच्या स्मृतीचा चिरंतन ठेवा जपण्यासोबतच मुंडे साहेबांनी शेवटच्या घटकापर्यंतच्या नागरीकांसाठी केलेला संघर्ष, सर्वांसाठी दिलेले लोकोपयोगी विचार तसेच त्यांच्या जीवनाचा प्रत्येक क्षण व केलेला संघर्ष गोपीनाथगडाच्या माध्यमातून मांडला जाणार असून, हा गड मुंडे साहेबांच्या विचारांचा व त्यांना अभिप्रेत असलेल्या सामाजिक शिकवणीला समर्पित असेल अशी घोषणा राज्याच्या ग्रामविकास मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांनी यावेळी केली. मुंडे साहेब परत येणार नाहीत, परंतू ते खरच परत येतील ते तुमच्या आमच्या आचरणातून, आपण रुजविलेल्या संस्कृतीतून, म्हणून चांगल्या विचारांचे बीजारोपण करण्यासाठी "गोपीनाथगड" उभारला जात आहे. बीड जिल्ह्यामध्ये नव्या राजकारणाची सुरुवात आपल्याला करावी लागेल.त्या दिशेने पडलेले पाऊल म्हणजेच गोपीनाथगडाची निर्मिती.मुंडे आणि महाजन यांच्याशिवाय महाराष्ट्राच्या भाजपला पुर्णत्व येऊ शकत नाही.बीड जिल्ह्यातील तरुणांना यशस्वी जीवनासाठी मार्ग दाखवण्याचे काम याच गडावर होईल. वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण, कार्यशाळा आयोजित करत असताना चांगले अधिकारी घडवण्याचे काम गोपीनाथगडाच्या माध्यमातून होईल असे सांगताना हा गड धार्मिक प्रचाराचा नसल्याचे पंकजाताईंनी स्पष्ट केले.

गोपीनाथ गडाला माझा आशीर्वाद - न्यायाचार्य डॉ.नामदेवशास्त्री

  • परळी येथे गोपीनाथगडाची स्थापना होत असताना अनेकांनी मला प्रश्न विचारले की,गड हे नाव कशासाठी ? परंतु आपल्या दैववान आणि भाग्यवान पित्याचा गौरव करण्यासाठी एका मुलीने केलेला हा संकल्प आहे. मुलीचे वडिलांवरील प्रेम हे नि:स्वार्थ असते.ती भावना आपण सर्वांनी लक्षात घ्यावी. म्हणूनच मी गोपीनाथगडाला आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असल्याचे न्यायाचार्य डॉ. नामदेवशास्त्री म्हणाले. तसेच एका भेटीत माणूस ओळखणारा मुंडेंसारखा देवमाणूस पुन्हा होणे नाही असेही ते म्हणाले.

मुंडे साहेब म्हणजे माणूसकीचे मुर्तीमंत उदाहरण – भय्यू महाराज

  • गोपीनाथराव मुंडे यांना भेटल्यानंतर मला व्यक्तीच्या जीवनातील खरा संघर्ष कळला. त्यांच्यातील अनेक रूपे मी जवळून अनुभवली. अनेक पातळीवर ते लढत होते परंतु सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांच्यामध्ये मला माणूसकीचा मुर्तीमंत अनुभव आला.शेवटच्या श्वासापर्यंत मी त्यांना साथ दिली. अशा महान व्यक्तीचा जयंती दिवस शासनाने विशेष दिन म्हणून साजरा करावा अशी अपेक्षा भय्यू महाराजांनी व्यक्त केली.