गोपीनाथ पांडुरंग मुंडे

अपघाती निधन

     भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांचे आक्रमक नेतृत्व अखेर हजारो नाही, तर लाखो चाहत्यांच्या उपस्थितीत आणि अतिशय शोकाकुल वातावरणात अनंतात विलीन झाले. एका वादळी जीवनाचा तेवढाच दुर्दैवी अंत झाला. कोणत्याही नेत्याचे निधन झाले की पक्षाची अपरिमित हानी झाली, पोकळी निर्माण झाली, अशा ठरावीक साचाच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जातात. मात्र, गोपीनाथ मुंडे यांच्या आकस्मिक निधनाने फक्त मराठवाड्यातच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रात खरोखरच मोठी पोकळी निर्माण झाली. भाजपाची अपरिमित हानी झाली.राज्यातील अनेकांचा नाथ गेला, हजारो कार्यकत्यार्र्ंनाच नाही तर सर्वसामान्य लोकांनाही आपण पोरके झाल्यासारखे वाटले. यातच मुंडे यांच्या नेतृत्वाचे यश आहे.ते लोकनेते असल्याची ही पावती आहे.

     गोपीनाथ मुंडे यांच्या अंत्ययात्रेला जनसागर लोटला होता. खूप मोठ्या संख्येतील लोक आले, तर जनसागर लोटला, असे म्हटले जाते. पण, मुंडे यांच्या अंत्ययात्रेला लाखो लोकांची गर्दी पाहून खर्‍या अर्थाने जनसागर उसळल्याची खात्री पटली. गोपीनाथ मुंडे जनसामान्यांचे नेते आहेत, लोकप्रिय नेते आहेत, असे म्हटले जात होते. पण, त्यांच्या अंत्ययात्रेला उपस्थितांची झालेली गर्दी पाहता त्यांची लोकप्रियता किती आहे, हे संपूर्ण देशाला पाहता आले. याआधी महाराष्ट्राने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची अंत्ययात्रा पाहिली. त्याची आठवण मुंडे यांच्या अंत्ययात्रेने जागी झाली.

     गोपीनाथ मुंडे यांचा आकस्मिक मृत्यू सर्वांनाच शोकसागरात लोटणारा आणि तेवढाच धक्कादायक होता. त्यांचा अपघाती मृत्यू झाला, पण हा अपघात तेवढा गंभीर नव्हता की त्यात कोणाचा मृत्यू व्हावा. अपघातातील दोन्ही गाड्यांची स्थिती पाहता यात कोणाचा मृत्यू होऊ शकेल, याची कल्पनाही कोणी करू शकत नाही. मुंडे यांना गंभीर स्वरूपाची दुखापतही झाली नव्हती. त्यामुळेच त्यांचा मृत्यू झाला, ही वस्तुस्थिती असतानाही ती स्वीकारण्याची त्यांच्यावर जिवापाड प्रेम करणार्‍यांची मानसिकता नाही. त्यामुळेच हजारो कार्यकर्ते ‘परत या परत या मुंडे साहेब परत या’ अशा घोषणा देत होते. एखादी व्यक्ती बराच काळापासून आजारी असेल वा त्याचा गंभीर असा अपघात झाला असेल, तर त्याच्या मृत्यूचे वास्तव कठीण असले, तरी स्वीकारले जाते. नियतीपुढे कोणाचे काही चालत नाही. एखाद्याचा मृत्यू आला असेल, तर तो बरोबर आपले सावज बेसावध क्षणी गाठतो, हेच खरे. ‘पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा’, असे जे म्हटले त्याची खात्री पटते. काही जणांच्या मनात गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूबद्दल संशयाचे वातावरण निर्माण होणे, हा अपघात नाही तर घातपात आहे, असे वाटणे स्वाभाविक आहे. त्यामुळेच गोपीनाथ मुंडे यांच्या अंत्यसंस्कारानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंह, भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, गृहमंत्री आर. आर. पाटील, शिवसेना नेते उद्धव ठाकरे आणि अन्य मंत्र्यांच्याही गाड्यांना घेराव घालत सीबीआय चौकशीची मागणी केली. संतप्त कार्यकत्यार्र्ंना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीहल्ला करावा लागला. सुदैवाने स्थिती हाताबाहेर गेली नाही. गोपीनाथ मुंडे यांचे पार्थिव परळीत अंत्यसंस्काराला आणले असताना लोकांच्या भावनांचा बांध तुटला.

     मुंडे यांच्या आकस्मिक मृत्यूने मराठवाडयातील पहिल्या फळीच्या नेतृत्वाचा अंत झाला. आधी भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन यांना नियतीने हिरावले. त्यानंतर राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा आजाराने दुर्दैवी अंत झाला, तर आता गोपीनाथ मुंडे सवार्र्ंना अनाथ करून निघून गेले. यातील दुर्दैवी योगायोग म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात परस्परविरोधी पक्षात असून देखील एकमेकांचे जिवाभावाचे मित्र आणि सख्खे शेजारी असलेले विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे काही वर्षांच्या अंतराने कधीच परत न येण्यासाठी निघून गेले. यातील आणखी एक दुर्दैवी योगायोग म्हणजे दोघेही महाराष्ट्राच्या राजकारणातून दिल्लीच्या राजकारणात गेले. दोघांकडेही योगायोगाने ग्रामीण विकास खातेच आले. आणि या पदावर असतानाच दोघांनाही जगाचा निरोप घ्यावा लागला. गोपीनाथ मुंडे यांना महाराष्ट्राची नाडी सापडली होती. जनतेच्या सुखदु:खाची त्यांना जाणीव होती. राज्यात भाजपाचे काम वाढवण्यात गोपीनाथ मुंडे यांचे अनन्यसाधारण योगदान होते. राज्यातील विधानसभा निवडणुका तीन-चार महिन्यावर आल्या असताना मुंडे यांचे जाणे भाजपाला धक्कादायक आहे.राज्यातील भाजपाचा चेहरा म्हणून त्यांची ओळख होती. प्रमोद महाजन यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर गोपीनाथ मुंडे मनातून खचले होते. कारण महाजन त्यांचे मेव्हणेच नाही, तर राजकारणातील मित्र, फिलॉसॉफर आणि गाईडही होते. पण महाजन यांच्या मृत्यूचे दु:ख हदयावर दगड ठेवून मुंडे यांनी सहन केले आणि महाजन आणि मुंडे या दोन परिवारांनाच नाही, प्रदेश भाजपालाही सावरले. आता मात्र मुंडे आणि महाजन ही कुटुंबे अनाथ झाली आहेत. महाजन यांचा राजकीय वारसा त्यांची कन्या पूनम महाजन, तर मुंडे यांचा वारसा त्यांची कन्या पंकजा सांभाळत आहे. पूनम महाजन खासदार, तर पंकजा परळीची आमदार आहे. पण पंकजा यांचा प्रत्यक्ष जीवनातील फादर आणि राजकारणातील गॉडफादर हरपला आहे. तीच स्थिती पूनम महाजन यांचीही आहे. भाजपाच्या कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची स्थितीही यापेक्षा वेगळी नाही.